| कोलाड | विश्वास निकम |
मुंबई- गोवा महामार्गावरील कामाचा पेच दिवसेंदिवस ठेकेदारांकडून अडचणीचा ठरत असल्याने सरकारचा अंधाधुंदी कारभार आणि ठेकेदाराची मनमानी कारभारामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले असून, आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील चौपदरी करण्याच्या कामाला 18 वर्षे पूर्ण झाले असून, अद्याप हे काम पूर्ण होऊ शकले नाही. उन्हाळ्यात या महामार्गाचे काम संथगतीने काम सुरु असते तर पावसाळा सुरु झाल्यानंतर या महामार्गावरील रस्त्याला पडलेले खड्डे भरण्याचे काम सुरु असते. हे खड्डे माती मिश्रित खडीने भरले जातात. प्रचंड पाऊस पडल्यामुळे या महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अनेक वाहने स्लीप होऊन अपघात होत असून, या अपघातात अनेकांचा नाहक बळी जात आहे तर अनेकांना अपंगत्व येत आहे. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.
या महामार्गालागत असणाऱ्या असंख्य गावाकडे जाण्याचे मार्ग ही अतिशय निष्कृष्ट दर्जाचे करून ठेवल्यामुळे खेडेगावात जाण्यासाठी अनेक अडचणीना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये महामार्गावरील तळवली, वरसगांव, भिरा मार्ग, गोवे, पुई, खांब अशा अनेक ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेली अनेक वर्ष या महामार्गाचे काम सुरू असून, किती ठेकेदार आले, किती गेले तरी महामार्गाचे काम काय पूर्ण होईना? परंतु, यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गांवर अनेक ठिकाणी बस थांबा स्थानक ही उपलब्ध नाहीत. याशिवाय अपूर्ण गटार, अपूर्ण उड्डाण पुल, महामार्गाची काही ठिकाणी झालेली चाळण यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत असून, हा वनवास कधी संपणार असे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.