पहिल्यांदा आदिती तटकरेंना, तर दुसर्या टर्मला गोगावलेंना संधी
| अलिबाग | प्रतिनिधी |
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली. परंतु, पालकमंत्रीपदावरुन अनेक जिल्ह्यात राडा पाहायला मिळाला. परंतु, भाजपापुढे महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अखेर नमते घेत पदरात येईल ते पवित्र करुन घ्यावे लागले. परंतु, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा घोळ कायम होता. राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे आणि शिवसेनेकडून भरत गोगावले यांनी दावा केला होता. त्यामुळे पालकमंत्रीपदाचा निर्णय प्रलंबित होता. अखेर अडीच-अडीच वर्षांचा काळ ठरवत हा तिढा सोडविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु, त्यात सुरुवातीची अडीच वर्षे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार असून, त्यानंतरची अडीच वर्षे शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात येणार आहेत. परंतु, राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर पालकमंत्रीपद सोडेल का? की शिवसेनेच्या मंत्री गोगावलेंना वाट पाहात राहावे लागेल, हा येणारा काळच ठरवेल.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. रायगडचं पालकमंत्रीपद हे महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. तर, नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं. मात्र, या दोनही ठिकाणी पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे नेते इच्छूक होते. नाशिकसाठी दादा भुसे तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले हे इच्छूक होते. मात्र, पालकमंत्रीपद न मिळाल्यानं भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती.
भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळावं, अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील इच्छा होती. मात्र, त्यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही, त्यांच्याऐवजी आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं तर नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांना मिळालं. यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर महायुती सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली, अखेर आता हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा काळ ठरण्याची शक्यता आहे. पहिले अडीच वर्षे राष्ट्रवादी, तर दुसर्या अडीच वर्षांची टर्म शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे. पहिले अडीच वर्षे अदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे. तर दुसर्या अडीच वर्षांत पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.