अनेक गणपती कारखाने पाण्याखाली; कारखानदारांचे लाखोंचे नुकसान
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यात मागील 48 तासात सलग मुसळधार पाउस पडत असून या मुसळधार पावसामुळे पेणमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली अनेक गावांचा संपर्क तुटला. परंतु या पूरपरिस्थीतीचा सर्वात मोठा फटका गणपती मुर्तीकारांना झाला आहे. पेण शहरासह ग्रामीण भागांमध्ये 1,500 ते 1,600 गणपती कारखाने आहेत. यातील 80 टक्के कारखाने हे ग्रामीण भागात आहेत. यामध्ये ही सर्वात जास्त प्रमाण हमरापुर विभागाचा आहे. हमरापुर विभागामध्ये हमरापुर, तांबडशेत, जोहे, कळवे, दादर या गावांमध्ये सर्वात मोठे रोजगार हे गणपती कारखान्यातून उपलब्ध होते. दोनच महिने गणपती उत्सवाला राहिल्याने कारखानदारांची एकच लगबग सुरू असतानाच अचानक पावसाचा जोर वाढून भोगावती, बाळगंगा, पाताळगंगा या नद्यांनी रौद्ररुप धारण करून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण केली आणि या पुराचे पाणी गावोगाव शिरल्याने गणपती कारखानदारांना आपल्या मुर्ती हलवणे शक्य झाले नाही. त्यामुळे अनेक गणपती मुर्ती पुरामध्ये भिजल्या आहेत.
या अगोदर प्रदूषण मंडळाने गणपती कारखानदांची पी.ओ.पी वर बंदी आणून झोप उडवली आहे. आजतागायत शासन पी.ओ.पी बद्दल ठोस निर्णय घेत नसल्याने कारखानदारांच्या मनात संभ्रम होता. त्यामुळे पी.ओ.पी कडून कारखानदारांनी आपला मोर्चा शाडू मातीच्या मुर्तीकडे वळवला होता. पेण तालुक्यात जवळपास अडिच लाखांच्या आसपास शाडू मातीच्या मुर्ती तयार केल्या आहेत. आणि याच शाडू मातीच्या मुर्तींना पुराचा फटका बसल्याने तयार असणाऱ्या कित्येक मुर्ती पाणी लागल्याने विरघळले आहेत. दोन महिन्यावर आलेल्या गणेश उत्सवामुळे गणपती कारखानदारांसमोर मोठा यक्षप्रन निर्माण झालेला आहे. एकीकडे नुकसान तर दुसरीकडे गणेश भक्तांची मागणी. अशा कोंडीत गणपती कारखानदार फसला आहे. तरी शासनाने पुन्हा पुराचा सारासार विचार करून पी.ओ.पीवरील बंदी त्वरीत उठून कारखानदारांना दिलासा दयावा अशी मागणी बाप्पाच्या नगरीत जोर धरू लागली आहे.
योग्य ती कार्यवाही केली जाईलः तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे
गेली दोन दिवस पेण तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. मी आणि माझी टिम पुर्ण तालुक्यातील प्रत्येक बारीकसारीक घटनेवर लक्ष ठेउन आहे. त्यामुळे कोणतीच बाब माझ्या नजरेतून सुटली गेली नाही. गणपती कारखानदारांचे नुकसान झालेले मी पाहिलेले आहे. वरिष्ठांच्या आदेशनुसार ज्यांचे ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे त्यांचे पाणी ओसडल्या नंतर पंचनामे करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही हा पुर्ण तालुका माझा आहे आणि मी या तालुक्याची आहे.