पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केले शवविच्छेदन
। पनवेल । वार्ताहर ।
महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला.आबालवृद्ध या घटनेत मृत्युमुखी पावले. यावेळी संबधित मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याचे काम पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विशेष तज्ञ डॉ. बी. एम. काळेल व डॉ. प्रमोद पाटील यांनी केले. या डॉक्टरांचा सन्मान नुकताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते करण्यात आले. अतिशय कठीण परिस्थितीत जमिनीखाली सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवुन त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे काम डॉ. काळेल व त्यांच्या टीमने तळीये याठिकाणी प्रामाणिकपणे पार पाडले.

पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश जगताप यांच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी तळीये याठिकाणी जिकिरीचे काम करणार्या डॉ. बी. काळेल व त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला. तळीये याठिकाणी जवळपास 53 शवविच्छेदन डॉ. काळेल यांनी केले. छिन्नविछिन्न अवस्थेत असलेल्या मृतदेहांची ओळख पटवणे, अंत्यविधीसाठी कायदेशीर बाबी पूर्ण करून तात्काळ कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम काळेल यांनी केले.
याकरिता तीन दिवस पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथक तळीयेमध्येच तळ ठोकुन होते. डॉ. काळेल यांनी पनवेलमध्ये कोविड काळात शेकडो मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहेत.