धबधब्यावरील अतिउत्साह नडला; तरुणाच्या जीवावर बेतला

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पडघे कोळवाडीजवळील फणसवाडी येथील धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी तळोजा येथील तीन तरुण गेले होते. धबधब्यावरील अतिउत्साह एका तरुणाच्या जीवावर बेतला. त्याचा पाय घसरुन डोक्याला मार लागल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला.

हे तरुण मूळचे उत्तर प्रदेश गाजीपूरचे राहणारे आहेत. यातील एक तरुण तळोजात कायमस्वरूपी राहतो. त्याच्याकडे दोघे तरुण उत्तर प्रदेशमधून रोजगारासाठी आले होते. पूर्वी ते दोघे गुजरात राजकोटला सेंट्रिंगचे काम करायचे. रविवारी मौजमजा केल्यानंतर सोमवारपासून ते दोघे कामावर येणार होते. मात्र, पोहण्याचा आनंद घेताना यातील राणाप्रताप राम हा सणसवाडी धबधब्यावरून पाय घसरून पडला. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना फणसवाडी येथील रहिवासी जगन भगत याना कंटोली तोडताना दिसली. त्यांनी याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना दिली. त्याबरोबर घटनास्थळी पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक भोईर, श्री. गळवे, पोलीस शिपाई खैरनार, संजय दोरगे, श्री. चव्हाण आदींचे पथक दाखल झाले.

अवघड डोंगरात पोलिसांसह नागरिक तातडीने मदतीला पोहोचले. शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख संदीप तांडेल, पोलीस पाटील प्रमोद आगलावे, फणसवाडीचे नरेश भगत, जगन भगत, कमलाकर भगत, प्रकाश भगत, गुरुनाथ भोईर, उपसरपंच निखिल तांडेल, रवींद्र उलवेकर, प्रभाकर तांडेल यांनी मदतकार्य केले. मृतदेह डोंगरातील अवघड जागेतून गावाच्या ठिकाणी आणला. मृत झालेल्या तरुणासोबत गुलशन संजय रामकुमार, सूरज कैलास रामकुमार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, धबधब्यावर जाऊन मृत्यूला कवटाळू नका. जीवन अनमोल आहे. आपल्या जीवाची काळजी घ्या, असे आवाहन पुन्हा एकदा पनवेल पोलीस प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version