| रायगड | प्रमोद जाधव |
कामावरून घरी जात असताना वढाव-खानाव येथील पुलाजवळ आल्यावर अचानक पुल कोसळला. त्यामुळे जोरदार तो आदळला. हातासह छातीला दुखापत झाली. मात्र, दैवबलवत्तर म्हणून तो बचावला असल्याचे सांगण्यात आले.
स्वप्नील गायकर असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण वावे येथील रहिवासी आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन तो गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत आहे. अलिबागमधील रॅडीसन हॉटेलनंतर तो झिराड येथील व्हीला येथे नोकरीला आहे. गेल्या काही वर्षांपासून तो काम करीत आहे. नेहमीप्रमाणे संध्याकाळी काम झाल्यावर साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याची दुचाकी घेऊन निघाला. पाऊस आल्याने अलिबागमध्ये थांबला. पाऊस गेल्यावर पुन्हा तो घरी वावेकडे दुचाकीवरून जात होता.
एका बाजूला पाऊस पडल्यास भिजण्याची धास्ती, दुसऱ्या बाजूला काम आटोपल्यावर घरी जाण्याची ओढ होती. अशा मनःस्थितीत मार्गक्रमण करीत असताना वढाव ते खानावदरम्यानच्या पुलाजवळ आल्यावर अचानक त्याची गाडी अचानक खाली सरकू लागली. काही वेळ तो स्तब्ध झाला. काय घडतेय हे त्यालाही कळत नव्हते. अशातच एकदम जोरदार दणका मिळाला. त्यात त्याची गाडी आणि तोदेखील काही अंतरावर फेकला गेला. क्षणभर काही झालेय हे त्यालाही कळले नाही. घटनास्थळी तो दोन ते तीन मिनिटे एकटाच होता. दरम्यान, याठिकाणावरुन जाणाऱ्या काही बाब पादचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्याला तात्काळ काढण्यात आले. त्याला दुखापत झाली होती. त्याही परिस्थितीत तो खानावच्या दवाखान्यात गेला. त्यानंतर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी गेला. डॉक्टरांनी तपासणी करून एक्स-रे काढले. त्याच्या हाताला व छातीला दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या तो अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलीस फक्त पंचनाम्यासाठी आले. त्यानंतर कोणीही अधिकारी त्याला भेटण्यासाठी आले नसल्याची खंत स्वप्नीलने व्यक्त केली.





