5 महिने मिळाला नाही पगार
कर्जत लसीकरण संघर्ष समितीची नाराजी
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिड प्रतिबंधात्कम लसीकरणची सेवा अखंडित सुरू ठेवणारे दोन आरोग्य कर्मचारी गेले पाच महिले वेतनावाचून वंचित आहेत. याबाबत कर्जत लसीकरण संघर्ष समितीने नाराजी व्यक्त केली आहे. कोव्हिडवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हा एक प्रभावी उपाय असून, यासाठी सर्व यंत्रणा गेली दोन वर्ष अविरत मेहनत घेत आहेत. यानुसार मार्च 2021 पासून कर्जत नगरपालिका प्रशासनाने आपल्या आरोग्य सेवेतील दोन महिला कर्मचारी यांना उपजिल्हा रुग्णालयात सेवेत नियुक्त केले आहे.
प्रतिक्षा सिंग आणि शाहीन मुजावर या दोन तरुणी कर्जत नगरपरिषदेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात प्रतिबंधात्मक लसीकरणाचे कर्तव्य प्रामाणिक हेतुने निभावत आहेत. मात्र, याचे कर्जत नगरपरिषद प्रशासनास त्याचे काहीच सोयरसुतक नाही. नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे सदर तरुणींना सप्टेंबर 2021 पासुन कुठल्याही प्रकारचे वेतन दिले गेलेले नाही.याबाबत कर्जत लसीकरण संघर्ष समितीने नाराजी व्यक्त केली आहे.
कर्जत नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांना जर सहा महिने वेतन मिळाले नसते, तर त्यांनी नक्कीच गदारोळ केला असता. पण या कंत्राटी कामगार यांच्या पगाराबाबत कोणीही एक पाऊल पुढे जाऊन पगार मिळावा यासाठी धावपळ करीत नाही. तरी कर्जत नगरपालिका प्रशासनाने याबाबत आवश्यक ती कारवाई करावी.- विनोद पांडे, कर्जत लसीकरण संघर्ष समिती