| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील वांद्रे परिसरात एका 36 वर्षीय महिलेने तिच्या 10 वर्षांच्या मुलाची वायरने गळा आवळून हत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.9) संध्याकाळी घडली आहे. अभिलाषा औटी असे या महिलेचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोपी महिलेला स्क्रिझोफेनिया हा आजार असून त्यातून तिने ही हत्या केल्याचे पुढे आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिलाषा औटी ही त्यांच्या कुटुंबियांबरोबर वांद्रे पूर्वेला असणाऱ्या खेरवाडी परिसरात राहते. गुरुवारी संध्याकाळी अभिलाषा आणि तिचा मुलगा सर्वेश दोघेच घरात होते. अभिलाषा हिला स्क्रिझोफेनिया आजार असल्याने तिची मानसिक स्थिती स्थिर नव्हती. अशातच काही कारणामुळे तिला राग आला आणि रागाच्या भरात तिने सर्वेशला बेडरुममध्ये खेचत नेले. त्यानंतर बेडरुमचा दरवाजा बंद करत वायरने त्याचा गळा आवळला. त्यामुळे सर्वेशचा मृत्यू झाला. ऑफीसमधून घरी आल्यानंतर सर्वेशच्या वडिलांना संपूर्ण प्रकार समजला. त्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी त्यांनी पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिलाषा औटी यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे. पोलीस सध्या या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.