वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका; जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून, काही भागांमध्ये तापमान 36 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात आहे. या वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संभाव्य रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात उपचार कक्ष सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये एकूण 37 हून अधिक खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे 10 खाटांचा विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. तर पेण, रोहा, पनवेल, माणगाव, श्रीवर्धन आणि कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये प्रत्येकी चार खाटांचे कक्ष तयार करण्यात आले आहेत. याशिवाय उरण, चौक, कशेळे, मुरूड, म्हसळा, तळा, जसवली, महाड आणि पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी दोन खाटांचे उष्माघात कक्ष उपलब्ध आहेत. या सर्व कक्षांमध्ये आयस पॅक, कोल्ड बॉक्स यांसारख्या आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होत असून, त्याठिकाणी काँक्रिटीकरण वाढत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी मे महिन्यात जाणवणारे तीव्र ऊन आता मार्च-एप्रिलपासूनच जाणवू लागले आहे.
सकाळी दहानंतरच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना बाहेर पडताना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकजण उन्हापासून बचावासाठी छत्री, स्कार्फ यांचा वापर करत आहेत, तर काहीजण दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, बाहेर काम करणारे कामगार, हृदयरोग व उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, मानसिक आजार असणारे आणि गर्भवती महिलांना उष्णतेचा अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे.
उष्माघाताच्या संभाव्य धोक्याचा विचार करून आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
सध्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, उन्हाचे चटके तीव्रतेने जाणवत आहेत. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघातासाठी स्वतंत्र उपचार कक्ष उभारण्यात आले असून, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, सुती व फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत, तसेच अनवाणी बाहेर जाऊ नये. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
डॉ. शीतल जोशी,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक






