राजनाला कालव्याची पावसामुळे दुरवस्था

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील 2000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणणाऱ्या राजनाला कालव्याचे काही दिवसांच्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. कालव्याच्या कराळेवाडी, हेदवळी, सावळे भागातील नाल्याला या पावसाचा फटका बसला आहे. दुबार शेतीचा हंगाम डिसेंबर महिन्यात सुरु होतो, त्याआधी कालव्याची दुरुस्ती जलसंपदा विभागाने करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. दरम्यान, जलसंपदा विभागाकडून या कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, यावर्षी दुबार शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन केले आहे.

राजनाला कालव्याचा उजवा कालवा म्हणजे कराळेवाडी, मांडवणे, हेदवली व सावळे गावापर्यंत जाणारा कालवा. या कालव्यामुळे शेकडो एकर जमीन उन्हाळीताखाली ओलीताखाली येत असते. या कालव्यामुळे दुबार शेतीसाठी शेतकऱ्यांना चालना मिळत असते. 2023 ते 2024 रोजी या कालव्याला पाणी सोडले असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये भाताचे पीक पाहायला मिळाले. परंतु, मुसळधार पावसामुळे कालव्याचे अनेक भागांत नुकसान झाले आहे. कालव्याच्या काही नाल्याचे काँक्रिटीकरण पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेले आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच, शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारा मार्गही या नाल्याच्या निकृष्ट कामामुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. यंदाच्या वर्षी या नाल्याच्या कामाला सुरुवात झाली; परंतु, हे काम चालू असताना पाटबंधारे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केल्याचेही स्थानिक शेतकऱ्यांकडून तक्रार केली जात आहे. दरम्यान हेदवली येथील शेतकरी हरिचंद्र म्हसकर, राम गायकर, संतोष जोशी, झिपा जोशी, मंगल जोशी अशा अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version