। पनवेल | प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव गावाकडे जाणारा संपर्क मार्ग जलमय झाला असून, गावाला जोडणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नदीच्या प्रवाहाला मोठा वेग आल्याने गावाचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला असून, ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पुलावरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू असल्याने वाहतुकीस पूर्णपणे अडथळा निर्माण झाला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना पूल ओलांडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गावातील नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठीही बाहेर पडणे कठीण झाले असून शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच संपर्क मार्ग पूर्ववत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






