। रायगड । प्रतिनिधी ।
चार दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने रायगडमधील धरण साठ्यात वाढ झाली आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. 28 प्रकल्पांत 49.60 टक्के पाणी साठा जमा झाला आहे. रोहा तालुक्यातील सुतारवाडी आणि म्हसळा तालुक्यातील संदेरी आणि पाभरे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे.
जूनच्या सुरुवातीला कोलाड येथील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 प्रकल्पांत केवळ 23 टक्के पाणी साठा शिल्लक होता. यातील 9 धरणांमध्ये दहा टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाई जाणवत होती. आठवडाभरापूर्वी यात केवळ चार टक्के वाढ झाली होती. जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती बिकट झाली होती. मात्र, 24 जूननंतर जिल्ह्यात मॉन्सून पुन्हा चांगल्याप्रकारे सक्रिय झाला आहे. चार दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. धरणच्या क्षेत्रातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे.
1 जूनपासून जिल्ह्यात 596 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील नद्या पूर्ण क्षमतेने वाहू लागल्या आहेत. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. 64.261 दशलक्ष घनमीटर पाणी साठा धरणांमध्ये जमा झाला आहे. अलिबाग तालुक्यातील श्रीगाव आणि मुरूड तालक्यातील फणसाड या दोन धरणांचा अपवाद सोडला तर इतर धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. अन्य चार धरणे 50 टक्के भरली आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उपलब्ध पाणी साठा
0 ते 10 टक्के फणसाड, श्रीगाव,
11 ते 30 टक्के कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, रानवली, कोलते-मोकाशी, डोणवत, पुनाडे
31 ते 50 टक्के कार्ले, खैरे, मोरबे, बामणोली,
51 ते 75 टक्के आंबेघर, कुडकी, भिलवले, उसरण
76 ते 99 टक्के कोथुर्डे आणि वावा.
तालुकानिहाय धरणे
मुरूड (1), तळा (1), रोहा (1), पेण (1), अलिबाग (1), सुधागड (5), श्रीवर्धन (3), म्हसळा (2), महाड (4), कर्जत (2), खालापूर (3), पनवेल (3), उरण (1) या तेरा तालुक्यात 28 धरणे बांधली गेली आहेत. या धरणातून जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील 28 धरणांत 68.261 दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता आहे.
