नवी मुंबईत वीस लाखांचे हेरॉईन जप्त

तिघांना अटक, एका महिलेचा समावेश

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबई पोलिसांनी हेरॉईन हा अंमलीपदार्थ विक्रीप्रकरणी दोन पुरुष आणि एका महिलेस अटक केले आहे. त्यांच्याकडे 100 ग्रॅम वजनाचे हेरॉईन आढळून आले असून त्याचे मूल्य वीस लाख आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. तुर्भे एमआयडीसीतील प्रेमनगर येथील नवजीवन शाळेनजीक असणार्‍या एका घरातून अंमली पदार्थ पुरवले जात असल्याची माहिती पोलीस हवालदार गणेश पवार यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त, भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडु, पोलीस हवालदार रमेश तायडे, उत्तम लोंखडे, गणेश पवार, पोलीस शिपाई योगिता शेळके, अर्चना पाटील, अंनत सोनकुळ, या पथकाने त्या ठिकाणी छापा घातला. पथकाच्या हाती तीन आरोपी लागले असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. आरोपींकडे 20 लाख रुपये किमतीचा 100 ग्रॅम वजनाचा हेरॉईन हा अंमली पदार्थ आढळून आला. त्यांच्याविरुध्द तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख करीत आहेत. या आरोपींची अंमली पदार्थ पुरवणारी साखळी असून अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली.

Exit mobile version