| खरोशी | प्रतिनिधी |
शहरी व औद्योगिक विकासाठी प्रकल्प अशी या हेटवणे धरणाची नव्याने ओळख होत आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील या मोठ्या धरणाची निर्मिती ही खारेपाट विभागात सिंचन आणि पिण्याचे 24 तास पाणी मिळेल यासाठी झाली आहे. मात्र, आता जलबोगदा तयार करून शहरासाठी, औद्योगिक विकासासाठी या पाण्याचा उपयोग करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. वास्तविक, हे पाणी पळविण्याचे धोरण राबवित असताना, स्थानिक ग्रामपंचायत ते आमदार, खासदार या सर्वोच्च लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले असावे. मात्र, जनतेची काळजी असणारे लोकप्रतिनिधी याला संमती देणार कसे, पण तरीही असे धोकादायक काम होत आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे वाशी खारेपाटातील सामाजिक कार्यकर्ते सी.आर. म्हात्रे यांनी सांगितले.
बोगद्याच्या कामामुळे लगतच्या डोंगरांना तडे जाण्याचा धोका निर्माण होणार आहे. भूस्खलन होताना दिसेल, भूगर्भातील पाण्याचा प्रवाह बदलेल, असे अभ्यासक म्हणतात. उत्तर प्रदेशातील जी हानी आपणास दिसते, ती याचेच द्योतक आहे. एवढे मोठे हेटवणे धरण असूनही धरण उशाला कोरड घशाला अशी अवस्था वाशी खारेपाटासह खेड्यातील जनतेची असून, दोन-तीन दिवस पाण्याची वाट पाहावा लागत आहे.24 तास पाण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, सिंचनासाठीचे 766 कोटींचे कार्यारंभ होत नाही. पुढे जाऊन दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल, इतर राज्यातून हद्दपार झालेले कारखाने जलवाहतुकीमुळे तालुक्यात येत आहेत. पेण तालुका भाताचे कोठार राहील का, अशी शंकाही व्यक्त केली आहे.
याबाबत जनसुनावणी न घेता बोगद्याचे काम सुरू आहे हे चित्र धोकादायक आहे, येथे साधी भोळी माणसे राहतात, आमचे हक्काचे पाणी पळवून नेऊ पाहतात, प्रशासन शहरी लोकांची काळजी घेते आम्हाला मात्र आठवड्यातून दोनदा, तीनदा पाणी येते हे योग्य नाही. जर बोगद्यातून पाणी गेले की आठवड्यातून एकदा पाणी अशी अवस्था होईल.
पर्यावरणप्रेमी संघटनांनी या होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन करूनच पुढील कामाची सुरुवात करावी, अशी सूचना दिली आहे, असेही सी.आर. म्हात्रे यांनी सांगितले.







