ग्रामीण शाळांत हायटेक प्रयोगशाळा

अत्याधुनिक साहित्य खरेदीला हिरवा कंदील; जिल्हा नियोजन समितीकडून तीन कोटींचा निधी

| रायगड | खास प्रतिनिधी |

ग्रामीण भागातील शाळांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. शालेय शिक्षणाच्या सर्वांगीण विकासाकरिता नियोजन विभागाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. जिल्हा नियोजन समितीने ग्रामीण भागातील शाळेतील विज्ञान प्रयोगशाळा हायटेक करण्यासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांना सुमारे 306 संच पुरवण्यात येणार आहेत. प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांची मोहोर उमटण्याची प्रतीक्षा आहे.

खासगी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा दिल्या जातात. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अशा सुविधा देण्यावर बंधने येतात. तरीदेखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षणासाठी सरकार निधीची तरतूद करत असते. उपलब्ध होणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ग्रामीण भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांना अधिक सुविधा देणे शक्य होत आहे.

जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीच्या दोन हजार 566 शाळा आहेत. 96 हजार विद्यार्थी संख्या आहे. ग्रामीण भागातील शाळांना प्रयोगशाळोसाठी लागणारे पुरेसे साहित्य नाही. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे तीन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पैकी 60 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित आहे.


जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सायन्स लॅबसाठी साहित्य पुरवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पटसंख्या कमी आहे, त्या शाळेतील विद्यार्थ्यांना जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमधील प्रयोग शाळेत अभ्यासासाठी नेण्यात येणार आहे. साहित्य प्राप्त होणार असल्याने ग्रामीण भागातील शाळेतील प्रयोग शाळा हायटेक होण्यास मदत होणार आहे.

पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी
Exit mobile version