हिंद टर्मिनल्समध्ये भरतीला स्थगिती

आधी भूमीपुत्रांच्या मागण्यांवर चर्चा करा: पोलीस उपायुक्त अमित काळे

| चिरनेर | प्रतिनिधी |

चिरनेर येथील हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगारांची भरती केल्याचा आरोप करत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या मागण्यांवर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होईपर्यंत कोणतीही नवीन नोकरभरती न करण्याचे निर्देश नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले आहेत. त्यामुळे प्रस्तावित मोर्चा 25 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल यांनी दिली.

दरम्यान, ग्रामस्थांनी मोर्चा काढू नये यासाठी हिंद टर्मिनल्स कंपनी व्यवस्थापनाने मोर्चापूर्वीच सर्वपक्षीय नेत्यांविरोधात कारवाईची मागणी करत उरण न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने कंपनीची मागणी फेटाळून लावत ग्रामस्थांना मोर्चा काढण्याची परवानगी दिली होती. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये यासाठी पोलिस उपायुक्त अमित काळे आणि न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर गायके यांनी मध्यस्थी करत ग्रामस्थांना शांत केले. तसेच ग्रामस्थांचे शिष्टमंडळ आणि हिंद टर्मिनल्स कंपनी व्यवस्थापन यांच्यात तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. यानुसार मंगळवारी (दि. 10) एसीपी किशोर गायके यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस कंपनी व्यवस्थापनाकडून कॅप्टन अफान कापडे व विवेक वाघोडे उपस्थित होते. तर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळात सरपंच भास्कर मोकल, राजेंद्र खारपाटील, शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उपसरपंच अरुण पाटील आणि अलंकार परदेशी आदींचा समावेश होता.

चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारलेल्या हिंद टर्मिनल्स सीएफएस कंपनीने सुमारे 200 परप्रांतीय कामगारांची भरती केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, अशी मागणी करत ग्रामस्थांनी कंपनीकडे जाब विचारला होता. मात्र कंपनी व्यवस्थापनाने याबाबत निर्णय घेण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल, अशी भूमिका मांडली. या बैठकीत ग्रामस्थांनी विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. अखेर स्थानिकांच्या मागण्यांवर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होईपर्यंत कोणतीही नवीन भरती न करण्याचे निर्देश पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रस्तावित मोर्चा 25 मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version