| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहरात शनिवारी (दि.25) सायंकाळी 4.30 वाजता आयोजित करण्यात आलेले विशाल हिंदू संमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी माणगाव व परिसरातील हिंदू बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संमेलनाचे अध्यक्ष ॲड. केदार गांधी यांनी आपल्या प्रास्ताविक व मनोगतात हिंदू समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. समाज विविध स्तरांत विभागला गेला असून, बलशाली राष्ट्र उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर अश्विनी समेळ यांच्या किशोरी विकास प्रकल्पांतर्गत मुलींनी लाठीकाठीचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रायगडचे संघचालक शिवराज भागवत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संघाच्या 100 वर्षांच्या कार्याचा आढावा घेत समाजातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले. तसेच साक्षी कामत यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर प्रभावी मांडणी करत स्वबोध, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण आणि नागरिक कर्तव्य या पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख व्याख्याते सौरभ करडे यांनी छ.शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज यांच्या कार्याची आठवण करून देत हिंदवी स्वराज्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, वारकरी संप्रदायाच्या सर्वधर्मसमभावाच्या परंपरेवरही त्यांनी प्रकाश टाकला.







