| तळा | प्रतिनिधी |
महिला व बालविकास विभाग जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 यांच्या तीन टक्के निधीतून तळा बसस्थानकात स्तनदा माता व बालकांसाठी सुसज्ज हिरकणी कक्ष सुरु करण्यात आला आहे. तळा बसस्थानक हे तालुक्याचे केंद्र असल्याने प्रवासादरम्यान अथवा शासकीय कार्यालयांतून मातांना आपल्या लहान बाळांना स्तनपान करण्यासाठी किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी सुरक्षित आणि हक्काची जागा मिळत नाही. महिलांची हीच अडचण ओळखून या हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. याची रचना अत्यंत आकर्षक केलेली आहे. कक्षात मातांसाठी आरामदायी बसण्याची व्यवस्था, लहान बाळांसाठी पाळणा, खेळणी, मनोरंजनासाठी दूरचित्रवाणी संच आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. कक्षात महिलांची आणि बाळांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. कक्षाच्या भिंतींवर बालसंगोपन व आरोग्याविषयी संदेश देणारे सुंदर फलकही लावण्यात आले आहेत.






