मुंबई व मंगळूर या महत्त्वाच्या बंदरांना जोडण्याबरोबरच भारताच्या एकंदर पश्चिम किनारपट्टीतील अरबी समुद्राच्या किनार्यालगतच्या रायगड व कोकण प्रदेशाचा कायापालट करणारा कोकण रेल्वेचा प्रकल्प आता एका महत्त्वाच्या तसेच ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोचला आहे. कोकण रेल्वेचा इतिहास वाचणार्यांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जाणीव व्हावी आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्वही पटावे. देशात रेल्वे आणणार्या इंग्रज साहेबानेही अवघड आणि अशक्य मानून सोडून दिलेली कोकण रेल्वे कोकणच्या लोकांनी मात्र मनातून काढून टाकली नाही. त्यांच्या मागणीला मूर्त स्वरूप दिले ते मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या जोडीने. त्याआधी 1966 साली दिवा-पनवेल मार्ग बांधला गेला व 1986 मध्ये तो रोह्यापर्यंत वाढवण्यात आला. 1990 साली तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले अध्यक्ष बनले. त्यामुळे त्यांना रेल्वेमॅन असे नाव पडले. 15 सप्टेंबर 1990 रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ पार पडला होता. आता 2022 मध्ये या मार्गातील रायगड ते गोवा या टप्प्यातील विद्युतीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. एकंदर 740 किमी लांबीचा हा मार्ग रायगडमधील महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, सिंधुदुर्गमधील कुडाळ, गोव्यात करमळी, कर्नाटकात कारवार व उडुपी अशा प्रत्येकी 100 किमी लांबीच्या सात भागांमध्ये विभागण्यात आलेल्या व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरु करण्यात आलेल्या या प्रकल्पाची ही नवीन पूर्तता आहे. त्यातून रेल्वे अधिक सक्षम आणि वेगवान होण्यास मदत होईल. रेल्वेचे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या नेतृत्वाखालील तांत्रिक पथकाने या मार्गावरील रत्नागिरीतील रत्नागिरी स्थानक ते गोव्यातील वेर्णा स्थानकापर्यंतच्या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याची तपासणी केली. त्यामुळे लवकरच कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या विजेवर धावण्यातील सर्व अडथळे दूर झाले असून त्याच्या वेगमर्यादेचे निकष प्राप्त होताच त्याचे वेळापत्रकही बदलेल. रायगडातील रोहा ते गोव्यातील वेर्णा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सात वर्षे सुरू होते. त्यापैकी रोहा ते रत्नागिरी या 285 किलोमीटरच्या टप्प्याचे विद्युतीकरण चार महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावर रत्नागिरी ते दिवा ही पॅसेंजर गाडी आणि रत्नागिरीपर्यंत येणार्या मालगाड्या सध्या विजेवर धावत आहेत. त्यानंतर चालू वर्षाच्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रत्नागिरी ते वेर्णा या स्थानकापर्यंतचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी पूर्ण झाल्यावर या संपूर्ण विद्युत प्रवासाला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. कारण, या टप्प्याला पोचल्याने कोकण रेल्वेच्या संपूर्ण 740 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात पोचले आहे. यापैकी मडगाव ते कारवार, कारवार ते मंगळूरजवळचे ठोकूर या विद्युतीकरण आधीच झालेल्या मार्गाची यापूर्वीच तपासणी केली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये येणारा कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग डिझेलऐवजी विद्युत इंजिनांसाठी सुसज्ज होईल. अर्थात, इलेक्ट्रिक इंजिनांची उपलब्धता आणि वीज सबस्टेशनची उर्वरित कामे पूर्ण होईपर्यंत थोडा अवकाश लागणार असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक इंजिनासह चालविल्या जातील. प्रारंभी केवळ लांब पल्ल्याच्या गाड्यांना विद्युत इंजिनद्वारे चालवण्यास प्राधान्य मिळणार असून कालांतराने सर्व गाड्या विजेवर धावतील. त्यामुळे मुंबई व मंगळूर या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा हा एकमेव मार्ग अधिक सक्षम आणि व्यावसायिकदृष्ट्या लाभदायक ठरेल. हा मार्ग मुंबई ते केरळ असा असल्याने भारताच्या पश्चिम किनारपट्टीतील चारही राज्यांना लाभदायक आहे, तसेच स्थानिक पातळीवरही रोजगार आणि व्यवसायाला प्रोत्साहन देण्यास हा मार्ग कारणीभूत ठरला आहे. त्यात रायगड आणि कोकणातील व्यवहार किती आणि कसे वाढले याचा अनुभव या भागांतील जनता घेत आहे. आता त्याला अधिक वेग येईल. माल लवकर पाठवता येईल आणि मागवता येईल, तसेच प्रवाशांची आवकजावक देखील तितक्याच प्रमाणात वाढेल. मुख्य म्हणजे डिझेलमुळे होणारे प्रदूषण कमी होईल. कोरोना संपल्याचे वृत्त आले, त्याबरोबरच आलेली ही अजून एक सकारात्मक बातमी आहे. या प्रदेशासाठी ती लाभदायक आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या खडतर प्रवासातील हा विकासाचा टप्पा नोंदला गेला पाहिजे.
ऐतिहासिक टप्पा

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
by
Santosh Raul
July 22, 2024