वनसंपदा जळून खाक प्राण्यांचा अधिवास नष्ट
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पालीतील प्राचीन सरसगड किल्ल्यावर महिनाभरात तब्बल 6 मोठे मानवनिर्मित वणवे लागले आहेत. या वणव्यामुळे किल्ल्याचा बहुतांश सर्वच भाग जळून होरपळला आहे. यामध्ये किल्ल्यावर नव्याने लावलेले रोपे व संवर्धन केलेली झाडे जळून खाक झाली. शिवाय येथील माकडे, वानरे व पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच त्यांचा अधिवास देखील नष्ट झाला.
स्थानिक नागरिक व वन विभागाचे कर्मचार्यांनी वणवा विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यामुळे किमान मानवी वस्तीत आग आली नाही. वारंवार लागणार्या वनव्यांमुळे किल्ल्याची प्रचंड प्रमाणात हानी होत आहे. पालीतील नागरिकांना देखील याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.
जैवविविधतेला धोका
नैसर्गिक व कृत्रिम वणव्यांमुळे सरसगडावरील जैवविविधता व सजीव सृष्टी धोक्यात येत आहे. तसेच प्रदुषण वाढते आहे. पालीकरांना तापमान वाढीला सामोरे जावे लागत आहे. किल्ल्यावरील सरटणारे जीव, किटक आणि झाडे-झुडपे, वनस्पती आगीमध्ये भस्मसात झाले. विविध प्राण्यांचे व पक्षांचे आसरे-निवारे संपुष्टात आले. त्यांची पिल्ले देखिल या आगीत होरपळून मेली.
बहुतांश वणवे मानवनिर्मित आहेत. वणवे रोखण्यासाठी व आपत्ती निवारणासाठी गावपातळीवर 10 तरुणांची टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मानवनिर्मित वणवे रोखण्यासाठी गावागावातील लोकांचे प्रबोधन व जनजागृती केली जात आहे. ग्रामपंचायतींना देखील आवाहन केले आहे. वणवे रोखण्यासाठी व्हिडीओ डॉक्युमेंटरी केली जाईल.
– दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली सुधागड