तरुण गंभीर जखमी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावर गुरुवारी (दि.2) भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये तरुणीचा मृत्यू झाला असून, तरूणाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना दुपारच्या सुमारास सुडकोलीजवळ घडली असून, दुचाकीचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वृषाली वाघमारे असे या मृत तरुणीचे नाव आहे. तर, ईश्वर पवार असे जखमी तरूणाचे नाव आहे. हे दोघे गुरुवारी दुचाकीने अलिबागकडून रोहाकडे जात होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते सुडकोली नवखारची डुंगीजवळ आल्यावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामध्ये रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या नाल्यात वृषाली वाघमारे ही तरूणी पडली. तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच, ईश्वर पवार हा तरूण देखील गाडीवरून खाली पडला. त्यालाही गंभीर दुखापत झाली असून, अधिक उपचारासाठी त्याला अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन अपघाताची संपुर्ण माहिती घेतली.
