। हिमाचल प्रदेश । वृत्तसंस्था ।
हिमाचल प्रदेशातील चंबा-नूरपूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि.11) पहाटे भीषण अपघात झाला आहे. चंबा जिल्ह्यातील काकिरा भागात पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा क्रिस्टा गाडी अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल 300 मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडीतील सर्व प्रवासी हे गुजरातचे होते. मनालीवरून दालहौसीकडे जात होते. अपघाती कारमधून 10 प्रवासी प्रवास करत होते. अपघाताच्यावेळी परिसरात मुसळधार पाऊस पडत होता रात्रीचा वेळ आणि डोंगराळ भागातील अवघड वळणे यामुळे कार अनियंत्रित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कार अनियंत्रित होऊन तब्बल 300 मीटर खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अंधार आणि खोल दरीमुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.





