| पेण | प्रतिनिधी |
पेण-खोपोली रोडवरील भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात आज दुर्दैवी अपघात घडला असून, या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर पडलेला खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षा चालकाने वाहन डाव्या बाजूला घेतले. मात्र, त्या ठिकाणी कोणताही संरक्षक कठडा नसल्याने रिक्षा थेट नदीपात्रात कोसळली. या अपघातात रिक्षा चालक एकनाथ किंजवडे (53) रा. कामार्ली, ता. पेण यांना पेण उप जिल्हा रुग्णालय येथे नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर या घटनेत भूषण पाटील रा. कराडे, पो. रसायनी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित ठिकाणी रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला होता. याबाबत वारंवार राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या पेण शाखेकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी
