| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मुंबईतील चौघांचा मृत्यू झाला असून, 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कुटुंब मुंबईतल्या जोगेश्वरी येथील रहिवासी आहेत. ते कुटुंबासह त्र्यंबकेश्वरला गेले होते. देवदर्शनाहून परतताना अटगावजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकला गाडीने जोराची धडक दिली. हा ट्रक दोन वर्षांपूर्वी जळाला होता आणि तसाच रस्त्याच्या कडेला होता. हा अपघात इतका भीषण होता की गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. तर 6 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात श्रीराम जैस्वाल, आयुष जैस्वाल, लाडो जैस्वाल आणि सुरज जैस्वाल यांचा मृत्यू झाला आहे.







