अंबा नदी पुलावर टँकरचा भीषण अपघात

। नागोठणे । प्रतिनिधी ।

रिलायन्स कंपनीतील उत्पादन प्रक्रियेत आवश्यक असलेले रसायन कंपनीत रिकामे करून मुंबईकडे भरधाव वेगाने निघालेल्या कॅप्सुल टाईप लांबलचक टँकरला नागोठण्यातील अंबा नदीच्या पुलावर भीषण अपघात घडला. हा अपघात सोमवारी (दि. 5) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने घडला. पुलाचा कठडा मजबूत असल्याने टँकर नदीत जाण्यापासून वाचला. त्यामुळे सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे. मात्र, या अपघातात पुलाच्या कठड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तुटलेला हा कठडा रिलायन्स कंपनी प्रशासनाने तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.



रिलायन्स कंपनीतून निघालेल्या टँकरला अंबा नदीच्या पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती रिलायन्स प्रशासनाला मिळताच त्यांचे सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अंबा नदीवरील पुलाचा कठडा तोडून, कठड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून पुलावर अडकलेला टँकर काढण्यासाठी रिलायन्स कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेने रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अपघाताची माहिती दिली. मात्र, नागोठणे पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी व ठाणे अंमलदार यांना कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, नागोठणे पोलिसांना या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत भोईर व वाहतूक शाखेचे पोलीस नाईक राजू पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तातडीने क्रेन मागवून अडकलेला टँकर बाजूला करण्यात आला. टँकर काढत असताना पुलाच्या दोन्ही बाजूला काही वेळेसाठी वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान सध्या रिलायन्स कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रिलायन्स कंपनीत ये – जा करणाऱ्या अवजड वाहनांची नागोठणे – पोयनाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्याने पादचारी, दुचाकीस्वार, कार आदी छोट्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. असे असतानाच अपघातग्रस्त टँकरची माहिती पोलीस प्रशासनाला तातडीने न देणे म्हणजे रिलायन्स प्रशासनाची वाढत चाललेली मनमानी या घटनेत दिसून आल्याने याबद्दल स्थानिक नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात रिलायन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनवडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून कॉल उचलण्यात आला नाही.

Exit mobile version