| लातूर | प्रतिनिधी |
रेणापूर तालुक्यातील गरसोळी येथे एका शेतात राहत असलेल्या दाम्पत्याच्या चोरीच्या उद्देशाने रात्री खून करण्यात आला. घरातील महिलेच्या डोक्यात कुकरने घाव घालून आणि दगड विटांनी ठेचून ठार करण्यात आले, तर दिव्यांग पतीला विहिरीत फेकून देत खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दोन दिवसानंतर उघड झाली असून या धक्कादायक घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गरसोळी शिवारातील शेतामध्ये रावसाहेब मुकुंद कातळे व पुष्पलता कातळे हे दाम्पत्य वास्तव्यास होते. रविवारी रात्री दाम्पत्याचा खून करून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. यामध्ये अंगावरील सोने काढून घेत महिलेच्या डोक्यात कुकर मारून तसेच दगड-विटांनी ठेचून खून करण्यात आला होता, तर पुष्पलताचे पती रावसाहेब यांना उचलून नेऊन समोर असलेल्या विहिरीत चोराने फेकून दिले. याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.