माथेरानमध्ये घोडे बंद
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षा श्रमिक हातरिक्षा चालक यांना चालविण्यास देण्यात आल्या आहेत. या ई-रिक्षा चालविताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम मोडण्यात आले. त्यामुळे त्या विरोधात नगरपरिषद प्रशासनाने कारवाई करावी या मागणीसाठी माथेरानमधील घोडे आज बंद ठेवण्यात आले. दरम्यान, पालिकेने कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले नाही तर यापुढे देखील घोडे रस्त्यावर येणार नाहीत असा निर्धार माथेरानमधील अश्वपालकांनी केला आहे. तर घोडे रस्त्यावर आले नसल्याने पर्यटकांना पॉइंटवर जाण्यासाठी घोडे उपलब्ध झाले नसल्याने पर्यटकांची गैरसोय झाली.
10 जून रोजी माथेरानमध्ये हातरिक्षा चालक यांच्यासाठी ऐतिहासिक निर्णय झाला. शहरात पर्यटकांची ने-आण करण्यासाठी 94 हातरिक्षा चालविल्या जातात. त्यातील 20 हातरिक्षा चालकांना पहिल्या टप्प्यात ई-रिक्षा चालविण्याची संधी मिळाली आहे. त्या 20 हातरिक्षा चालकांनी खरेदी केलेल्या आणि सर्व वाहतूक परवाना मिळालेल्या ई-रिक्षांचे 10 जून रोजी लोकार्पण करण्यात आले. त्या सर्व ई-रिक्षा 11 जून रोजी माथेरान शहरात प्रवाशांच्या सेवेत आल्या. त्या रिक्षाबाबत माथेरानमधील स्थानिक अश्वपाल संघटना तसेच मुळवासी अश्वपाल संघटना यांनी आज 12 जून रोजी आंदोलन पुकारले. त्यावेळी माथेरानमध्ये प्रवासी वाहतूक करणारे 464 घोडे रस्त्यावर आले नाहीत. सर्व अश्वपालकांनी घोडे रस्त्यावर न काढता सकाळी माथेरान नगरपरिषदेवर एकत्र जात पालिका मुख्याधिकारी आणि प्रशासक राहुल इंगळे यांना निवेदन दिले. स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघटनांचे अश्वपालक पालिकेत गेले होते. त्यावेळी स्थानिक अश्वपाल संघटना आणि मुळवासी अश्वपाल संघटना यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 11नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता ई-रिक्षा प्रवासी यांच्या सेवेत येणे आवश्यक असताना काही ई-रिक्षा घालून दिलेल्या वेळेचे नियम डावलून उशिरा दाखल झाल्या. 20 ई-रिक्षा यांना परवानगी असल्याने आता ज्या सात रिक्षा पालिकेच्या आवारात आहेत. त्यांना शहराबाहेर पाठविण्यात यावे.
न्यायालयाचा आदेशाने 20 ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातील काही रिक्षा वाहतूक नियम पाळत नाहीत. तसेच अनेक ईरिक्षांना नंबरदेखील नाहीत. अशा ई-रिक्षांवर विभागीय वाहतूक परिवहन अधिकारी यांनी कारवाई करावी. नवीन ई-रिक्षा चालकांकडून झालेल्या अपघाताची चौकशी करावी. शालेय विद्यार्थी आणि प्रवासी यांच्या सुरक्षिततेबाबत कोणती तरतूद आहे. 11 जून रोजी काही ई-रिक्षा या मनाई हद्दीत गेल्या होत्या. रिगल नाका आणि उषा एस्कोट हॉटेल येथून काही ई-रिक्षा प्रवाशांना अधिक भाडे घेवून गेल्या आहेत. त्या सर्वांबद्दल अश्वपाल संघटनांनी पोलिसांना माहिती दिली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच आगाऊ रक्कम घेवून प्रवासी वर्गाला सेवा दिली गेली काय? सेवा दिली असल्यास त्या ई-रिक्षांवर कारवाई करावी. अशा अनेक मागण्यांचे निवेदने स्थानिक अश्वपाल संघटना तसेच मुळवासी अश्वपाल संघटनांनी पालिकेला दिले आहे. या सर्व मागण्याबद्दल लेखी पत्र पालिकेकडून दिले जात नाही तोवर माथेरानमध्ये घोडे प्रवासी वाहतूक करणार नाहीत. लेखी पत्र मिळत नाही तोवर माथेरानमधील सर्व प्रवासी घोडे बंद ठेवले जाणार आहेत अशी माहिती अध्यक्ष आशा कदम यांनी दिली आहे.