आगीत संसाराची राखरांगोळी; सुधागडात घराला आग

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील उन्हेरे बुद्रुक (धनगरवाडी) येथील राम धोंडू ढेबे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत दोन लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल व रोख रक्कम जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या आगीत 50 किलो गहू, कपडे, 3 तोळे सोने, 1 क्विंटल तांदूळ, 1 कुलर, 4 प्लास्टिक बॅरल, इतर खाण्याचे पदार्थ, मुलांचे शैक्षणिक साहित्य असे मिळून तब्बल 1 लाख 78 हजारांचा मुद्देमाल व 23 हजार रुपये रोख रक्कम जळून खाक झाली आहे. त्यामुळे राम ढेबे यांचे तब्बल 2 लाख 1 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढे मोठे नुकसान झाल्याने राम यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.

तलाठ्यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. यावेळी पोलीस पाटील शिवमूर्ती पवार व गावकरी उपस्थित होते. ही आग नक्की कशाने लागली याचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र, आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज राम यांनी व्यक्त केला. गावकर्‍यांनी मिळून ही आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

Exit mobile version