उरणमध्ये घराची भिंत कोसळली

। उरण । प्रतिनिधी ।

उरण शहरातील भवरा येथील एनबीसीसी चाळीत शुक्रवारी (दि.24) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास फैयाज शेख यांच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत घराचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास घराची भिंत अचानक कोसळल्याने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मोठा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी त्वरित प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत दुर्घटनाग्रस्त घराची पाहणी केली. यावेळी त्यांनी फैयाज शेख व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

सुरक्षेच्या दृष्टीने शेख कुटुंबाची तात्पुरती राहण्याची व्यवस्था अन्य सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनामार्फत घराच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण करण्यात आला असून, आर्थिक मदत व इतर आवश्यक शासकीय सहाय्य मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या घटनेमुळे उरण शहरातील जुन्या, जीर्ण व धोकादायक घरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा इमारती व घरांचे तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक बांधकामांवर आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.

Exit mobile version