गृहिणींची रानभाज्यांना पसंती

पनवेल । वार्ताहर ।

पावसाळा सुरू झाला की रानभाज्या बाजारात विक्रीसाठी येतात विशेषतः श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येतात. पावसाळ्यात आरोग्यदायी आहार घेण्याची सर्वांना आवश्यकता असते. निसर्गाने आपल्याला रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत. रानभाज्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. रानभाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाणीव असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी विविध ठिकाणी रानभाज्या उत्सवही साजरे केले जातात. या उत्सवातून रानभाज्यांची जाणीव नसलेल्या व्यक्तींना रानभाज्यांचे महत्त्व कळते.

आदिवासी महिला रानभाज्या बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. काही भाज्या सर्दी, ताप तसेच दम्यावर उपचार म्हणून आवर्जून खाल्ल्या जातात. या भाज्यांमध्ये लोह, खनिज, जीवनसत्वे यांचा भरपूर प्रमाणात साठा असतो. तसेच या भाज्या प्रामुख्याने पावसाळ्यातच उपलब्ध होतात. त्यामुळे त्याचा आस्वाद पावसाळ्यातच घेतला जातो. तसेच या रानभाज्या शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही जेवणासोबत खाता येतात. विशेषतः पावसाळ्यात या भाज्यांची चवही वेगळीच असते. त्यामुळे नागरिक पावसाळ्यात रानभाज्यांना विशेष पसंती देतात.

कॅल्शियमचे प्रमाण अधिक
अंबाडी, काटेसावर, भोकर, कद्दू, दवणा या भाज्यांमध्ये जस्त व कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. रानकेळी ही खोकल्यावर रामबाण उपाय आहेत.या भाज्यांमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात टाकळाच्या पानाचा लेप विविध त्वचा विकारांवर लावतात.

Exit mobile version