| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या होतायेत. या निवडणुकीत स्थानिक नेतेमंडळी व पुढारी आपल्या वरिष्ठ नेतेमंडळीची मर्जी राखण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. साम, दाम, दंड भेद याचा वापर करून आपली प्रतिष्ठा व अस्तित्व जपण्यासाठी सार्यांचीच धडपड सुरू आहे.
सुधागड तालुक्यात 14 ग्रामपंचायतीसाठी निवडणूका होत आहेत. राज्यपातळीवर जरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप मिळून शिंदे व भाजपला तगडे आव्हान म्हणून उभे राहात असले तरी गावपातळीवर मात्र हे चित्र उलट सुलट पहावयास मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुक सर्व राजकीय पक्ष, नेते यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. सर्वपक्षीय स्थानिक नेतेमंडळी, पुढार्यांची ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी मोठी कसरत सुरू आहे. पुढार्यांचे मतदार राजाला भेटून भेटून व पळून पळून वजन घटले आहे, काहींना तर या निवडणुकीत विजय मिळवून वरिष्ठ नेत्यांपुढे आपले वजन वाढविण्यासाठी हीच खरी संधी असल्याचे वाटत आहे. त्यामुळे एरव्ही बाजूने गेला तरी ढुंकून न बघणार्या मतदार नागरिकाला तुम्हीच आमचे तारणहार, आपल्या हातात आमची लाज आहे. हाता पाया पडतो, पण लाज राखण्याची मतदारांना विनवणी होताना देखील दिसतेय.
पाच वर्षात एखाद्या गावात न फिरकणारे पुढारी आता गोड गोड बोलून पाच वर्षांपूर्वी दिलेल्या विकासाच्या आणाभाका करत फिरत आहेत. यामध्ये तरुणांची टोळी ताब्यात घेऊन राजकीय मतांचे गोळाबेरीज करताना अनेकजण दिसतायेत. तर कुठे वृद्ध जुने जाणती मंडळी, महिला वर्ग घराघरात जाऊन मतदारांना आवाहन करताना दिसतात. रात्री पुढार्यांच्या गाव गल्लीबोळात घिरट्या वाढल्या आहेत, एक एक मतासाठी फिल्डिंग लावली जातेय. निवडणुका पार पडतील, विजयाचा गुलाल उधळला जाईल; पण विजयाने हुरळून न जाता व पराजयाने नाउमेद न होता हार-जित पचवण्याची ताकद, खिलाडू वृत्ती सर्वांमध्ये यावी, हीच अपेक्षा.