सरकारी दवाखान्यात लस मोफत; सार्वजनिक आरोग्य विभागाचा उपक्रम
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्भाशयाच्या कर्करोगासाठी काढलेली एचपीव्ही लसीकरण करण्यास कर्जत तालुक्यात सुरुवात झाली आहे. 14 ते 15 वयोगटात असलेल्या मुलींना हे लसीकरण केले जाणार असून, सरकारी रुग्णालयात ही लसीकरण केले जात आहे.
कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालय कशेळे येथे लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यावेळी डॉ. नितीन गुरव तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. बाबा कालेल वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कशेळे यांच्या उपस्थितीत एचपीव्ही लसीकरण मुलींना देण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या उपक्रमांतर्गत एचपीव्ही प्लस सुरक्षिततेचा दृढ संकल्प, गर्भाशयमूख कर्करोगापासून मुलींचे जीवन वाचवण्याचा नवा पर्याय म्हणून एचपीव्ही लस देण्याचे आवाहन करण्यात आले. सरकारी दवाखान्यात हे लसीकरण पूर्णपणे मोफत दिले जात आहे. महिलांना होणाऱ्या या कर्करोगाला आला घालण्यासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव आणि कशेळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबा कालेल यांनी केले आहे.
या लसीकरणसाठी शालेय मुलींना जनजागृती करून व पालकांच्या सहमतीनेच व्हॅक्सीन दिल्या जात आहेत. कशेळे ग्रामीण रुग्णालयामध्ये एचपीव्ही प्लस देण्याची सुरुवात झाली असून, गुरुवारी (दि.9) दोन मुलींना व्हॅक्सिन देऊन याची सुरुवात झाली. श्रावणी गणेश घाग व तनया किसन बोराडे या दोन मुलींनी आई-वडिलांच्या सहमतीने एचपीव्ही व्हॅक्सिन देण्यात आली. यावेळी तनया या मुलीची आई वंदना बोराडे उपस्थित होत्या, तसेच श्रावणी मुलीची आई मनीषा घाग यांनी यावेळी उपस्थित राहून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.
सध्या केंद्र सरकारमार्फत 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी शाळा आणि सरकारी आरोग्य केंद्रांतर्गत मोफत लसीकरण मोहिमा राबवल्या जात आहेत. या एचपीव्ही लसीकरणाच्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयाशी किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांशी संपर्क साधावा. अशी माहिती कशेळे ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिका भ्रांती भोईर यांनी दिली. तसेच यावेळी डॉ. नितीन गुरव, डॉ. बाबासो कालेल, सुरेश चव्हाण आरोग्य सहाय्यक के.आर. आडे, आरोग्यसेविका कशेळे, रत्नमाला मानकर आरोग्य सहायिका, प्रकाश घुगे आरोग्य सेवक, गोपाल काटकर आधीपरिचारक हे उपस्थित होते.
एचपीव्ही गर्भाशय मुखाचा होणारा कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सरकारी यंत्रणेतील फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिली जात आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये तीन ते चार हजार रुपये घेतले जातात. परंतु, सरकारी यंत्रणेत फ्री ऑफ कॉस्ट दिली जात आहे. मी आव्हान करतो की जो गैरप्रकार म्हणजे अफवांवर विश्वास न ठेवता कर्जत तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लसीकरण सुरू आहे.
डॉ. नितीन गुरव
तालुका आरोग्य अधिकारी
