। बंगळूरू । वृत्तसंस्था ।
दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारत ‘अ’ आणि इंडिया ‘ब’ हे संघ आमने-सामने आहेत. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ‘अ’ संघाकडून खेळणार्या यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने एक मोठा कारनामा केला आहे. या सामन्यात ‘ब’ संघ दुसर्या डावात फलंदाजी करत असताना यष्टीरक्षण करणार्या ध्रुव जुरेल सातत्याने व्यस्त राहिला. त्याच्या चांगल्या यष्टीरक्षणाचा फायदा ‘अ’ संघाच्या गोलंदाजांनाही झाला. त्याने या डावात तब्बल 7 झेल घेतले आहेत. त्याने यष्टीमागे यशस्वी जयस्वाल, कर्णधार अभिमन्यू ईश्वरन, मुशीर खान, सर्फराज खान, नितीश कुमार रेड्डी, साई किशोर आणि नवदीप सैनी यांचे झेल घेतले. यामुळे तो दुलीप ट्रॉफीमध्ये एकाच डावात यष्टीरक्षक म्हणून 7 झेल घेणारा एमएस धोनीनंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे. धोनीने 2004-05 हंगामात दुलीप ट्रॉफीमध्ये इस्ट झोन (उत्तर विभाग) संघाकडून खेळताना एकाच डावात यष्टीरक्षण करताना 7 झेल घेतले होते. दुलीप ट्रॉफीमधील सामन्याच्या एका डावात सर्वाधिक झेल घेणार्या यष्टीरक्षकांच्या यादीत जुरेल धोनीसह संयुक्तपणे अव्वल क्रमांकावर आला आहे. या विक्रमाच्या यादीत दुसर्या क्रमांकावर सुनील बेंजामिन आणि सदानंद विश्वनाथ हे संयुक्तपणे आहेत.