लिफ्ट घेणे-देण्याचे प्रमाण वाढले, विद्यार्थी, वृद्ध आणि चाकरमान्यांना दिलासा
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
एसटीच्या संपामुळे गाव गाडा विस्कळीत झालाच, मात्र दैनंदिन प्रवास व दळणवळणावर देखील मोठा परिणाम दिसून येतोय. एसटी संपामुळे पाली सुधागड सह जिल्ह्यातील गाव-खेड्यातील व्यवहार व जीवनक्रम मंदावला आहे. शाळकरी मुलांचे देखील एसटी अभावी पायपीट व हाल होतांना दिसत आहेत. मात्र या सगळ्या ऊहापोहात अनेकांनी माणुसकी जागवलेली दिसली. विद्यार्थी, चाकरमानी व वृद्धांना अनेक वाहनचालक लिफ्ट देतांना दिसत आहेत.त्यामुळे त्यांचा प्रवास सुखाचा होत आहे.
गावे व वाड्या विविध कारणांनी शहरी व निमशहरी भागांशी जोडल्या आहेत. गाव व आदिवासी वाड्यापाड्यांतून शहराकडे व इतर मोठ्या गावात दूध, भाजी घेऊन येणारे विक्रेते, मजूर, विद्यार्थी आणि कामधंद्यासाठी जाणारे चाकरमानी यांना एसटीचाच आधार आहे. मात्र एसटी संपामुळे त्यांची खूप मोठी गैरसोय होतांना दिसली. खाजगी वाहने लूट करत आहेत. मात्र अशावेळी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या या लोकांना अनेक वाहनचालक व दुचाकीस्वार आपल्या सोबत घेऊन जात आहे. त्यांना मोफत लिफ्ट देत आहेत. परिणामी या लोकांना दिलासा मिळत आहे. इच्छित स्थळी पोहचणे सुलभ होत आहे. गावांमध्ये तर दुचाकीवर आता तिघे ते चौघेजण नाईलाजाने प्रवास करत आहेत. गावातील एखादा वाहनचालक किंवा दुचाकीस्वार कामानिमित्त इतरत्र जात असेल तर आवर्जून गावातील कोणी सोबत येतेय का हे विचारून त्यांना सोबत नेत आहेत. लिफ्ट देण्याचा आणि घेण्याचा हा पायंडा नक्कीच आदर्शवत आहे.
- एसटी संपामुळे लोकांचे खूप हाल होत आहेत.कामानिमित्त फिरत असतांना रस्त्याच्या कडेला उभे असलेले विद्यार्थी, वृद्ध,छोटे विक्रेते आदींना नियमित लिफ्ट देतो.वेळ पडली तर त्यांना इच्छित स्थळी देखील सोडतो. -अमित निंबाळकर, तरुण सामाजिक कार्यकर्ते
- शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी नसल्याने व खाजगी वाहने परवडत नसल्याने रस्त्याच्या कडेला वाहनांना लिफ्ट मागत उभे रहावे लागते. अनेकजण स्वतःहून थांबून विद्यार्थ्यांना लिफ्ट देतात ही खूप चांगली बाब आहे. – सोनिया माळी, विद्यार्थीनी
व्हॉट्सअप ग्रुपचा आधार
अनेक ठिकाणी स्थानिक व्हॉट्सऍप ग्रुप आहेत. या ग्रुपवर नियमित कोण कुठे जाणार आहे किंवा कुठून येणार सोबत या किंवा सांगा असे मेसेज येतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी जायचे असेल तिथे तो मोफत व वेळेत पोहोचतो.
