पुण्यातून दुबईला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅगेतून कोट्यवधी परदेशी चलन जप्त
। पुणे । प्रतिनिधी ।
अंमली पदार्थांची तस्करी, अवैध रोख रक्कमेची वाहतूक करण्यासाठी अनेक क्लृप्त्या योजल्या जातात. आता चक्क विद्यार्थ्यांनी त्यांच्या वह्यांच्या पानांचा वापर यासाठी केला आहे. भारतातून दुबईला गेलेल्या तीन विद्यार्थ्यांकडे असलेल्या वह्यांच्या पानांमध्ये तब्बल 4.47 कोटी रुपये परदेशी चलन पुणे कस्टम विभागाने जप्त केले आहे. पुण्यातील एका ट्रॅव्हल एजंटला कस्टम अधिकार्याने अटक केली होती. त्यानंतर कस्टम विभागाकडून संशयित हवाला रॅकेटचा तपास केला जात होता. या तपासातून तीन महिला विद्यार्थी आणि मुंबईतील एक फॉरेक्स व्यावसायिक दुबई ट्रिपला गेले असल्याचे कळले.
पुणे कस्टमला मिळालेल्या माहितीनूसार, दुबईला गेलेल्या तीन महिला विद्यार्थ्यांच्या नोटबुकच्या पानांमध्ये काळजीपूर्वक लपवून मोठ्या प्रमाणात परकीय चलन तस्करी केले जात आहे. भारतीय अधिकार्यांच्या विनंतीनुसार, तिनही विद्यार्थी प्रवाशांना दुबईतील अधिकार्यांनी आगमन होताच भारतात परत पाठवले. दुबईहून पुण्याला जाणार्या तीन प्रवाशांना 17 फेब्रुवारी रोजी पुणे विमानतळावर रोखण्यात आले. एअर इंटेलिजेंस युनिट (एआययू) च्या अधिकार्यांनी प्रवाशांची कसून तपासणी केली आणि 400, 100 डॉलर्स (अंदाजे 3.47 कोटी रुपये) जप्त केले. तीन विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये असलेल्या अनेक नोटबुकच्या पानांमध्ये 100 डॉलर्सच्या नोटा लपवण्यात आल्या होत्या. तीन महिला प्रवाशांपैकी सर्वजण पदव्युत्तर शिक्षण घेत होते. त्यांची एआययू अधिकार्यांनी चौकशी केली. त्यांनी पुण्यातील खुशबू अग्रवाल नावाच्या ट्रॅव्हल एजंटकडून त्यांची ट्रिप बुक केली होती, असे उघड झाले. विद्यार्थ्यांनी सांगितले की अग्रवाल यांनीच त्यांना रोख रकमेसह बॅगा दिल्या होत्या.