अपघातात चार जनावरे मृत्युमुखी, कर्जत तालुक्यातील घटना
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात गोवंश तस्करीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत अशा अनेक कटांना उधळून लावले आहे. अशाच एका घटनेत, महाशिवरात्रीच्या दिवशी कशेळे परिसरातील धोत्रे गावात गोवंश तस्करी करणारी गाडी स्थानिक नागरिकांनी पकडली. मात्र, पाठलागादरम्यान गाडीचा भीषण अपघात झाला आणि त्यात चार गोवंश मृत्युमुखी पडले. ही घटना पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास घडली.
अज्ञात तस्करांनी चार गायी आणि एक बैल चोरी करून इनोव्हा गाडीत कोंबले होते. वाहतूक सोपी करण्यासाठी जनावरांना भूल देणारे इंजेक्शन दिले गेले होते. मात्र, काही जागरूक ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. तस्करांनी वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव गाडी एका मोरीच्या कठड्याला धडकली. या भीषण अपघातात चार जनावरे जागीच मृत्युमुखी पडली, तर एक गाय गंभीर जखमी झाली. स्थानिकांनी त्वरित पोलिसांना कळवले.
या घटनेत तस्करी करणारा गाडीतील एक आरोपी जखमी अवस्थेत सापडला. मात्र, त्याचे दोन साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर कशेळे दूरक्षेत्रातील पोलीस हवालदार लालासाहेब थोरवे, पोलीस शिपाई राहुल जाधव आणि हर्ष हंबीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक नवलेही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा करण्यात येत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत जनावरांचे अंत्यविधी त्यांच्या मालकाच्या उपस्थितीत करण्यात येणार असून, जखमी गाईवर त्वरित उपचार सुरू करण्यात आले आहेत.
कर्जत तालुक्यात गेल्या काही वर्षांत गोवंश तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. शेतीप्रधान आणि पशुपालनावर अवलंबून असलेल्या या भागात अशा घटनांमुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विविध ग्रामस्थांनी अनेकदा अशा गाड्या पकडल्या असल्या, तरी काही ठिकाणी आरोपी सुटत असल्याने त्यांचे धाडस वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.