वालपिकासह शेतजमिनीचे नुकसान; खारलँड विभागाचे दुर्लक्ष
| कोर्लई | वार्ताहर |
समुद्र व खाडीकिनारी केलेल्या बेकायदा भराव व बांधकामांचा फटका मुरुड तालुक्यातील शेतकर्यांना बसत चालला असून, खाडीचे पाणी बंधारा फोडून शेतात घुसत चालले आहे. यावेळीही मजगाव-खारदोडकुळे भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी खारबंदिस्त बंधारा तोडून शेतात घुसल्याने या भागातील शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकर्यांच्या तोंडाशी आलेल्या वालपिकाचे नुकसान झाले असून, खारलँड विभागाचे या भागाकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत शेतकर्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मागील पाच वर्षांपासून मजगात-खारदोडकुळे भागात खाडी परिसरात उधाणाच्या पाण्यामुळे नदीला खांड पडून भरतीचे पाणी शेतीत घुसत आहे. वेळोवेळी येथील शेतकर्यांनी खारलँड कार्यालयात अर्ज विनंत्या केल्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. दरवर्षी शेतात पाणी शिरुन समस्यांना तोंड द्यावे लागत असून, आजतागायत शेतकर्यांच्या जमिनी व पिकाचे लाखोंचे नुकसान झाले व होत आहे.
याबाबत येथील शेतकरी नथूराम तांबडकर यांनी संबंधित खारलँड विभागाशी शेतकरी बांधवांसह संपर्क साधून अर्ज विनंत्या, निवेदन देण्यात आले आहे. मात्र, अद्यापही याठिकाणी होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात खारलँड विभागाचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरत असल्याची खंत यावेळी तांबडकर यांनी व्यक्त केली. यंदाही उधाणाचे पाणी शेतात शिरून शेतकर्यांना शेतजमीन व वालपीक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
शासनाच्या खारलँड विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून याठिकाणी नदीला पडलेली खांड बुजविण्यात योग्य उपाययोजना करण्याची मागणी येथील शेतकरी बांधवांच्यावतीने नथूराम तांबडकर यांनी केली आहे.