। पेण । वार्ताहर ।
काळेश्री गावाच्या हद्दीत प्रथमेश काकडे कंपनीचा वर्ल्ड बँकेच्या मदतीने खारबंदिस्तीचे काम सुरु आहे. परंतु, हे काम निकृष्ट दर्जाचे तर आहेच, त्याचप्रमाणे नियोजनबद्घ नाही. काळेश्री गावच्या शेतकर्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. काळेश्री गावच्या हद्दीत उघाडी क्रमांक एकचे काम सुरु असून, ते काम करीत असताना उघाडीचे रिंग बांध चुकीच्या पद्धतीने घातला असल्याने, तो उधानाच्या पाण्याने फुटला असून, खारेपाणी शेकडो एकर जमिनीमध्ये घुसून जमीन नापीक होणाच्या मार्गावर आहे.
याबाबत प्रांत कार्यालयाशी ग्रामपंचायत काळेश्रीने लेखी पत्रव्यवहार केला असून, प्रांत कार्यालयाकडूनदेखील ठोस पावले उचलली जात नाहीत. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आज काळेश्री गावच्या हद्दीतील जमीन खार्यापाण्यात बुडाली असून, वेळेवर जर पाणी निघाले नाही, तर पूर्ण काळेश्री खलाटी नापीक झाल्याशिवाय राहणार नाही. या खारबंदिस्तीच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी उपअभियंता मिठारी यांची नेमणूक केली आहे. परंतु, हे अधिकारी ठेकेदाराचे हस्तक असल्याप्रमाणे वागून शेतकर्यांवर अन्याय करत आहेत. शेतकर्यांच्या जमिनीत गेलेल्या खार्यापाण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे ठेकेदाराची आहे, त्याचप्रमाणे अधिकारी वर्गाचीदेखील आहे. मात्र, अधिकारी याबाबीकडे दुर्लक्ष करत आहेत, म्हणून ग्रामपंचायत काळेश्रीचे सर्व सदस्य खारजमीन विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे कैफीयत मांडणार असल्याची माहिती काळेश्री उपसरपंच संजय पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.