| पाली/वाघोशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील खेमवाडी गावाजवळ ताडाईचा दरा येथे शनिवारी (दि.1) दुपारी मोठा वणवा लागला होता. या वणव्यात दोनशेहून अधिक आंबा, काजू, फणस, जांभूळ, निव व इतर झाडे जळून खाक झाली आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे 6 ते 7 लाखांचे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी सुदाम धायगुडे, किसन धायगुडे, अनंत धायगुडे, सौरभ धायगुडे व सुमित धायगुडे सर्व राहणार खेमवाडी यांच्या हाततोंडाशी आलेले आंब्याचे व काजूचे पीक अगीच्या भक्षस्थानी गेले आहे. या शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.4) तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व सरपंच यांना नुकसान भरपाई मदत मिळण्याबाबत निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी त्यांच्या आंब्याच्या व इतर झाडांभोवती पूर्ण जाळरेषा काढली होती. तरी देखील वणवा कसा लागला, हा प्रश्न उपस्थित होत आहे.