| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील तुर्भे स्टोअर परिसरात प्रस्तावित ‘वेस्ट टू एनर्जी’ आणि सीबीजी (कंप्रेस्ड बायोगॅस) प्रकल्पाविरोधातील आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून, दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच ठेवण्यात आले. स्थानिक नागरिक, झोपडपट्टीवासीय आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला असून “मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही,” अशी ठाम नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी भूमिका घेतली आहे. प्रशासनाला थेट इशारा देत, “भले जीव गेला तरी चालेल, पण तुर्भेकरांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही,” असे स्पष्टपणे सांगितले. उपोषणस्थळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
प्रस्तावित ‘वेस्ट टू एनर्जी’ आणि सीबीजी प्रकल्पामुळे तुर्भे परिसरातील नागरिकांना गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आधीच तुर्भे डम्पिंग ग्राउंडमुळे अनेक नागरिक त्वचारोग, दमा, क्षयरोग यांसारख्या आजारांनी त्रस्त असल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत आणखी प्रदूषण निर्माण करणारा प्रकल्प दाट लोकवस्तीच्या भागात उभारणे अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.“प्रकल्प इतरत्र हलवा, पण तुर्भे एमआयडीसी परिसरातील नागरी वस्तीजवळ नको,” अशी एकमुखी मागणी उपोषणस्थळी करण्यात येत आहे. प्रकल्पातून निर्माण होणारा धूर, दुर्गंधी आणि राख यामुळे भविष्यात हवा अधिक प्रदूषित होईल आणि स्थानिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाविरोधात उपोषण
