भातशेतीला ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका

तयार झालेली भातशेती वाया जाण्याची भीती
पडलेल्या रोगराईमुळे शेतकरी हवालदिल
मळेघर | वार्ताहर |
पिकलेल्या भातशेतीवर अगोदरच विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, अनेक ठिकाणी भातशेती आडवी झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. अशातच दोन दिवस येणार्‍या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे रायगडात भातशेतीला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शेतकर्‍यांनी चांगले बी-विबयाणे पेरुन उत्तम भातपिकासाठी मेहनत घेतली होती. काही शेतकर्‍यांनी दुबार पेरणी करुन भातशेती लागवड केली. त्यानंतर पडणार्‍या पावसामुळे भातशेतीही उत्तम बहरु लागली. मात्र, सतत पडणार्‍या पावसामुळे भातशेतीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. आणि, शेतकर्‍यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही शेतकर्‍यांनी फवारणी करुन रोगाचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही भातावरील रोगराई वाढतच राहिल्याने भातवाढीस अडचण होऊ लागली. वाढत्या रोगामुळे पिकलेल्या भाताचे नुकसान होऊ लागले असून, तयार झालेली भातशेती पावसाच्या भीतीने कापताही येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अशातच येत्या दोन दिवस येणार्‍या गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावाने जोरदार पाऊस आणि वादळ सुटल्यास शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली भातशेती नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी शेतकर्‍यांना भातशेतीच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याहीवर्षी शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून घेतो की काय, याची चिंता शेतकर्‍यांना वाटू लागली आहे. सध्या भातपिके चांगली असली तरी अनेक ठिकाणी भातशेतीवर रोगराई पडली असून, भातशेती आडवी झाली आहे.

Exit mobile version