गंभीर दुखापत करून जीवे मारण्याची धमकी; दोघांविरोधात गुन्हा दाखल
| पोलादपूर | प्रतिनिधी |
स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीत काय सुरू आहे, याची विचारणा करणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले. पेंड्याचा माच उभारण्यासाठी खड्डे खोदण्यास मज्जाव केल्याच्या रागातून पत्नीने शेतकऱ्याची गचांडी पकडून त्याला जमिनीवर पाडले, तर पतीने लोखंडी पारईने थेट डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. पोलादपूर तालुक्यातील वडघर पाटीलवाडी येथे घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली असून, हल्लेखोर पती-पत्नीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव गोविंद कदम (52) हे गुरांना चारा देण्यासाठी आपल्या मालकीच्या शेतात गेले होते. त्यावेळी अशोक पांडुरंग कदम (32) हा त्यांच्या जागेत पेंड्याचा माच उभारण्यासाठी खड्डे खोदत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यापूर्वीच संबंधित जागेत वाडा बांधलेला असल्याने माच उभारण्यासाठी खड्डे थोडे पुढे खोदावेत, असे नामदेव कदम यांनी अशोक याला समजावून सांगितले.
मात्र, याच गोष्टीचा राग आल्याने अशोक याची पत्नी विशाखा कदम (28) हिने पुढे येत नामदेव कदम यांना शिवीगाळ केली. ‘ही जागा तुझी आहे का?’ असे म्हणत त्यांची गचांडी पकडून जमिनीवर पाडले. त्यानंतर अशोक कदम याने खड्डे खोदण्यासाठी वापरली जाणारी लोखंडी पारई नामदेव कदम यांच्या डोक्यात मारली. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता, भावांना पुण्याहून बोलावून घेऊन जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.
याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात हवालदार शिंदे यांनी फिर्याद नोंदवून घेतली. त्यानुसार पती-पत्नीविरोधात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलादपूर पोलीस ठाण्याचा प्रभारी कार्यभार सांभाळणारे महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरोदे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.






