महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पादीरवाडी येथील आदिवासी महिलेने विहिरीत उडी मारून स्वतःचे आयुष्य संपवले होते. त्या महिलेच्या आत्महत्येबद्दल नेरळ पोलीस ठाणे येथे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरा, सासू आणि नणंद यांनी मानसिक त्रास दिल्याने ललिता सचिन झुगरे या विवाहितेने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

सचिन झुगरे यांची पत्नी ललिता यांचा मृतदेह 28 फेब्रुवारी रोजी त्याच भागातील चाफेवाडी येथील विहिरीत आढळून आला होता. मृतदेह सापडण्याआधी संबंधित विवाहित महिला हरवली असल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात दाखल होती. त्यामुळे नेरळ पोलिसांनी चौकशी सुरु केली असता ललिता झुगरे यांना तिचे पती सचिन रखमा झुगरे, सासू हिराबाई रखमा झुगरे आणि डिकसळ येथे राहणारी नणंद अशा तिघांवर ललिता हिचा मानसिक छळ केल्याचा आरोप निश्चित केला आहे. या तिघांनी ललिता यांचा छळ सुरु केल्याने त्यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांचे भाऊ कळंब बोरीची वाडी येथे राहणारे रवींद्र पुंजारा यांनी केला होता. ललिता झुगरे यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सचिन रखमा झुगरे यास अटक केली आहे.

Exit mobile version