| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील कोळखे, पेठ येथील बसेरा अपार्टमेंटमध्ये 24 फेब्रुवारी 2019 रोजी गणपत लक्ष्मण पवार याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली होती. या प्रकरणात जिल्हा न्यायाधीश 1, पनवेल यांनी निकाल देत आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, आरोपीच्या लहान मुलास पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिस पाटील पांडुरंग कोंडीराम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 2 च्या सुमारास कोळखे गावातील बसेरा अपार्टमेंटजवळ पोलीसांची हालचाल दिसल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे रुम नं. 1, ए विंगमध्ये बबिता गणपत पवार ही महिला बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेली आढळून आली. तिच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकण्यात आले होते व ती रक्ताच्या थारोळ्यात होती. तिचा पती गणपत पवार याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आणि नंतर त्याने विषारी औषध प्राशन केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात पाठवले, तर बबिता पवार हिला पनवेल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेतील विशेष बाब म्हणजे आरोपी व मयत यांचा अल्पवयीन मुलगा हा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. न्यायालयाने या लहान मुलाच्या साक्षीवर विश्वास ठेवत आरोपीस पत्नीच्या खुनाबाबत दोषी धरले. जिल्हा न्यायाधीशांनी दिलेल्या निकालात मुलाच्या भविष्यासाठी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. हा निकाल अन्यायाविरोधातील लढ्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून, अशा प्रकरणांमध्ये लहान मुलांच्या साक्षांनाही महत्त्व दिले जाऊ शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.