मला नाही व्हायचं समन्वयक- नितीश कुमार
| नवी दिल्ली | प्रतिनिधी |
भाजपच्या विरोधात उघडण्यात आलेल्या इंडिया आघाडीत समन्वयाच्या नेमणुकीवरुन धुसफूस सुरु झाल्याचे जाणवू लागले आहे. मुंबईतील बैठक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच नितीश कुमार यांनी आपल्याला इंडिया आघाडीचं समन्वयक पद नकोय, असं विधान केले आहे. त्यांच्या या भूमिकेमागे लालूंची चाल असल्याचं बोललं जात आहे. या राजकारणामुळे इंडिया आघाडीत बिघाडी झालीय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विरोधी पक्षांना एकत्रित आणत आघाडी स्थापन करण्यासाठी नितीश कुमार यांनीच प्रयत्न केले होते. मात्र जेव्हा विरोधक सक्षमपणे एकत्र येत आहेत तेव्हा मात्र नितीश कुमार महत्त्वाच्या पदापासून दूर राहण्याची भूमिका घेत आहेत. त्यांनीच याबाबत एक विधान केलं आहे.
मला विरोधी आघाडीचा समन्वयक व्हायचं नाही. या पदाची जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे तरी जाईल. आमचा प्रयत्न सर्वांना सोबत ठेवण्याचा आहे.
नितीश कुमार,मुख्यमंत्री
नितीश कुमारांचा समन्वयकांमध्ये समावेश होईल, अशी चर्चा सध्या सुरु होती. परंतु त्यांच्याच विधानाने आश्चर्य व्यक्त होत आहे. नितीश यांच्या या भूमिकेवरुन भाजपने निशाणा साधला आहे. लालू प्रसाद यादव यांनीच नितीश कुमारांसोबत खेळी केल्याचा ठपका भाजपने ठेवला. सुशील कुमार मोदी म्हणाले की, लालू यांनी राहुल गांधींचं नाव एक प्रकारे पुढे करुन नितीश यांच्या स्वप्नांना सुरुंग लावला. लालूंनी राहुल यांना वर घोषित केलं, त्यामागे त्यांची खेळी होती, असं मोदी म्हणालेत. सुशील मोदी पुढे म्हणाले की, राहुल यांना वर घोषित करुन लालू यांनी नितीश यांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे. नितीश हे समन्वयक पदावरही दावा करु शकत नाहीत. कारण मुंबईतल्या बैठकीमध्ये एक समन्वयक निवडण्यापेक्षा तीन-चार राज्यांमधून वेगवेगळे समन्वयक निवडले जावू शकतात. लालूंच्या सांगण्यानुसार जास्तीत जास्त समन्वयक निवडले तर आपसात सामंजस्य ठेवता येईल.
मागच्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीतील नेत्यांचे विधानं बघितले तर राहुल गांधी यांना ते प्रमोट करत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून राहुल गांधींचं नाव पुढे केलं होतं. पाटण्याच्या बैठकीमध्ये लालू प्रसाद यादव यांनी राहुल यांच्या लग्नाचा मुद्दा उपस्थित केला होता. सुरुवातीला हा विषय चेष्टेने घेतला गेला. परंतु आता त्यांच्या त्या विधानामध्ये मेसेज होता, असं राजकीय जाणकार सांगतात. त्यांनी राहुल गांधी यांचंच नाव खुबीने पुढे आणलं होतं. मआज तकफने यासंदर्भातील विश्लेषण केले आहे.
इंडिया आघाडीची पुढची बैठक मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होत आहे. उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष बैठकीचे आयोजक आहेत. याच बैठकीमध्ये इंडिया आघाडीचा लोगो आणि समन्वय समिती जाहीर होईल, असं आघाडीचे नेते सांगत आहेत.