मी कधीही मुलगी आणि पुतण्या भेद केला नाही- शरद पवार

| मुंबई । वृत्तसंस्था ।

जुलै 2023 या महिन्यात शरद पवारांना राजकारणात मोठा धक्का बसला. तो धक्का हा होता की अजित पवार यांनी पक्षातल्या 42 आमदारांना बरोबर घेत थेट सत्तेत सहभागी होणे पसंत केले. 2 जुलै 2023 या दिवशी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधला 42 आमदारांचा गट सत्तेत सहभागी झाला. या भूमिकेला शरद पवारांनी विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. यानंतर पक्षाचे चिन्ह आणि नाव हे अजित पवारांच्या गटाला देण्यात आले. लोकसभा निवडणुकीत बारामतीची लढत पार पडली आहे. अशात अजित पवार हे वारंवार म्हणत आहेत की आम्ही तुमच्या (शरद पवार) पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? आता यावर शरद पवारांनी उत्तर दिले आहे.

आम्ही वरिष्ठांच्या पोटी (शरद पवार) जन्माला आलो तर आम्हाला अध्यक्षपद मिळाले असते. काही झाले नसते, पक्ष माझ्या ताब्यात आला असता. खरं तर मी साहेबांच्या सख्ख्या भावाचाच मुलगा. त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही हे आमचे दुर्दैव. आम्हाला सांगितले गेले की मुलीला राष्ट्रीय अध्यक्ष करायचे आहे. आम्ही ते पण मान्य केले. असे अजित पवार यांनी म्हटले होते. तसेच शरद पवार यांचे वय झाले आहे. आता त्यांनी राजकारणात थांबायला पाहिजे असाही सल्ला अजित पवारांनी दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवरही हा मुद्दा समोर आला. या सगळ्यावर शरद पवारांनी एका कार्यक्रमात उत्तर दिले आहे.

सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात आणि अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात जबाबदारी देण्याचा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी दिला होता, पण मी तो स्वीकारला नाही, या म्हणण्यात तथ्य नाही. सुप्रिया यांना फक्त खासदारकी दिली. असून त्या लोकसभेतील पक्षाच्या गटनेत्या आहेत आणि आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आलेले नाही. मात्र अजित पवार यांना कायमच सत्तापदे दिली. राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्व काही देण्यात आले. मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही. सत्तेत असल्याशिवाय जनतेची कामे करता येत नाहीत, या अजित पवार यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही.

Exit mobile version