। नाशिक । वृत्तसंस्था ।
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भाष्य करत, मी लस घेतली नाही आणि घेणारही असे विधान नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात केले आहे.
गोपाळरावजी गुळवे यांच्या 81व्या जयंतीनिमित्ताने घोटी कृषी उत्पन बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 500 पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती असून स्थानिक महाविकास आघाडीचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आपल्या किर्तनात इंदुरीकर म्हणाले की, ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे, हे कळायला नको का? प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. 14 वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम 14 दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही.
दरम्यान, याआधी त्यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. ङ्गसम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होतेफ असं वादग्रस्त वक्तव्य कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही; इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य
