| पुणे | प्रतिनिधी |
आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ परिसरातील उदारमळा येथील हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) डाव्या कालव्यावरील पूल कोसळला आहे. ही घटना सोमवार दि. 2 रोजी घडली. सुदैवाने पुलावर कोणतेही वाहन अथवा पादचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पूल नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
महाळुंगे पडवळ येथील उदारमळा, बेंदवस्ती, घायाळमळा, आंबटकर, ठाकरवाडीतील नागरिकांना कालव्यावरील पूल हा महाळुंगे पडवळ गावात ये-जा करण्यासाठी कालव्यावरील पूल एकमेव रस्ता आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी कुकडी पाटबंधारे विभागामार्फत 90 साली पुलाचे बांधकाम केले होते. या पुलावरून दररोज जवळपास मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करतात. यात विशेषतः शेतीमाल व दूध वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते तसेच परिसरातील नागरिक व शाळकरी मुलांची या पुलावरून वर्दळ असते.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचा शेती व दुग्ध व्यवसाय असल्याने हा पूल कोसळल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गवळ्यांना दूध गाडीपर्यंत पोहोचविण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. पुलाचा राडारोडा पाण्यात कोसळल्यास कालवा फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.