अलिबाग-पनवेल विना थांबा सेवेवर भर
| अलिबाग | प्रमोद जाधव |
अवकाळी पावसाबरोबरच जून महिना सुरु झाल्याने जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे (लाँच) जलवाहतूक सेवा लवकरच बंद झाल्याचा भार एसटी महामंडळावर पडला आहे. त्यामुळे अलिबाग आगारातून थेट पनवेलपर्यंत विना थांबा सेवेवर भर देण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती आगार व्यवस्थापक चेतन देवधर यांनी दिली.
उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी यावर्षी पर्यटकांनी रायगडला पसंती दर्शविली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळी पर्यटक दाखल झाले. अलिबागसह वरसोली, काशीद, मुरूड, श्रीवर्धन अशा अनेक समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद पर्यटकांनी लुटला. सागरी क्रिडा बरोबरच उंट, घोडागाडी सवारीचा आंनद पर्यटकांनी घेतला. काही पर्यटकांनी आठ ते पंधरा दिवसासाठी एखादे घर घेऊन त्याच ठिकाणी राहून सुट्टी घालवली. मुंबई, पुणेच्या धावपळीच्या जगतातून मोकळा श्वास घेण्यासाठी पर्यटक यावर्षीदेखील रायगड जिल्हयात मोठ्या संख्येने आले होते. उन्हाळी सुट्टी संपण्याच्या वाटेवर आहे. पर्यटकांनी आता परतीचा मार्ग स्विकारला आहे. गेल्या चार दिवसापासून पर्यटक मुंबई, पुणेकडे रवाना होऊ लागले आहेत. मात्र यावर्षी अवकाळी पावसाबरोबरच जून महिना सुरू झाल्याने जलवाहतूक सेवा बंद झाली आहे. रेवस येथून भाऊचा धक्का, मांडवा येथून गेट वे पर्यंतची जलवाहतूक सेवा गेल्या पंधरा दिवसापासूनच बंद झाली आहे. त्यामुळे अलिबागमधून मुंबईकडे जाणाऱ्या पर्यटकांसह प्रवाशांना एसटी बसचा आधार घ्यावा लागला आहे. मुंबई, ठाणे, बोरीवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांसह पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून अलिबाग एसटी बस आगारातून गाड्यांचे नियोजन केले आहे. अलिबाग एसटी बस आगारातून थेट पनवेलपर्यंत विना थांबा एसटीच्या 80 फेऱ्या चालू आहेत. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अलिबाग आगारातून पनवेलपर्यंत ज्यादा बारा फेऱ्या सुरु केल्या आहेत. शिवशाही तसेच साधी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांकडून देण्यात आली आहे.
पर्यटकांसह प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून अलिबाग एसटी बस आगारातून अलिबाग – पनवेल विना थांबा सेवेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या
आहेत. शनिवार व रविवारी गर्दी वाढल्यास तात्काळ प्रवाशांसाठी बसची व्यवस्था केली जाईल. सध्या 80 फेऱ्या आहेत. त्यात आणखी 12 ज्यादा फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन केले आहे.
चेतन देवधर
आगार व्यवस्थापक
अलिबाग एसटी बस आगार