आयसीसी महिला विश्‍वचषक 2022- वर्ल्डकपमध्ये ‘या’ तारखांना भारताचे सामने

नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला क्रिकेट विश्‍वचषक 2022 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणार्‍या महिला वनडे विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. भारतीय संघाचा मिताली राजच्या नेतृत्वाखाली पहिला सामना 6 मार्च रोजी होणार आहे.
31 दिवस चालणार्‍या या स्पर्धेत एकूण 31 सामने खेळवले जाणार असून त्यात आठ संघ सहभागी होणार आहेत. पहिला उपांत्य सामना वेलिंग्टन येथे 30 मार्च रोजी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना 31 मार्चला तर विजेतेपदाचा सामना 3 एप्रिलला होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 4 मार्च रोजी होणार्‍या सामन्याने होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी विश्‍वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले.
या विश्‍वचषकाचे सामने लीग फॉरमॅटमध्ये खेळवले जातील ज्यात आठही सहभागी संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
ही स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात खेळली जाईल, जिथे प्रत्येक संघाला इतर प्रत्येक संघाशी स्पर्धा करावी लागेल आणि गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. आयसीसी महिला क्रिकेट विश्‍वचषक 2022 चा दुसरा उपांत्य आणि अंतिम सामना क्राइस्टचर्चच्या मैदानावर खेळवला जाईल. पहिल्या क्रमांकाच्या संघाला तिसर्‍या क्रमांकाच्या संघाशी आणि दुसर्‍या क्रमांकाच्या संघाला चौथ्या क्रमांकाच्या संघाचा सामना करावा लागेल.

हे संघ मैदानात उकरणार
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत आयसीसी महिला चॅम्पियनशिप 2017-20 मधील त्यांच्या स्थानांवर आधारित या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तर, न्यूझीलंड या स्पर्धेचे यजमान असल्यामुळे या विश्‍वचषकासाठी आपोआप पात्र ठरले आहे.

महिला विश्‍वचषकासाठी भारताचे वेळापत्रक

6 मार्च, भारत विरुद्ध पाकिस्तान, तौरंगा

10 मार्च, भारत विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन

12 मार्च, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, हॅमिल्टन

16 मार्च, भारत विरुद्ध इंग्लंड, तौरंगा

19 मार्च, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑकलंड

22 मार्च, भारत विरुद्ध बांगलादेश, हॅमिल्टन

27 मार्च, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, क्राइस्टचर्च

Exit mobile version